Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सोयाबीनला ६ रुपयांचा हमीभाव देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचा मुद्द्यावर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारला काही सवाल केले आहेत. 'भाजप महायुतीला झटका देण्यास बळीराजा सज्ज असल्याने सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झाली आहे', असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.
सोयाबीनला ६ हजार रुपयांचा हमीभाव देण्याची आश्वासन मोदींनी दिल्याची बातमी पोस्ट करत जयंत पाटील यांनी महायुतीला लक्ष्य केले.
"भाजप महायुती सरकारच्या पायाखालची जमीन सरकली की त्यांना शेतकरी आठवतो, लाडकी बहिण आठवते. लोकसभेत झटका दिल्यानंतर आता विधानसभेतही भाजप महायुतीला झटका देण्यास बळीराजा सज्ज असल्याने सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झाली आहे. पराभवाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भाजप महायुतीला आमचे काही सवाल आहेत", असे म्हणत जयंत पाटलांनी सवाल केले आहेत.
जयंत पाटलांनी महायुतीला कोणते प्रश्न विचारलेत?
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे तर ७.५ वर्षे राज्यात भाजपचे सरकार आहे तरी यांना राज्यातील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव का देता आला नाही?", असा प्रश्न जयंत पाटलांनी उपस्थित केला.
"सोयाबीनचा उत्पादन खर्च ५ हजार रुपयांच्यावर मग शेतकऱ्यांना फक्त ३२०० रुपये का मिळत आहेत? कापसाला ११ हजारांपर्यंत भाव मिळायचा तो आता ६-६.५ हजारांवर का आला? आमचा महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन करतो तरी आमच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून, सरकारच्या 'लाडक्या' उद्योगपतींच्या सोयीसाठी सोयाबीन सारख्या तेल बियांची आयात का केली जाते?", असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.
जीएसटी का आकारला जातोय?
"भाजप महायुती सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे म्हणता मग शेतकऱ्यांच्या बी-बियाणांवर, खतांवर, औषधांवर इतक्या मोठ्या प्रमाणात जीएसटी का आकारला जातोय ? महागाई का कमी केली जात नाही?", असा सवाल जयंत पाटलांनी महायुतीला केला आहे.