Jayant Patil | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडण्याची वेळ आली. माझे शिवसैनिक मला भेटून माझ्यासमोर सांगत असतील की मी मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे तर मी मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाला घातली. या प्रकारानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. या साऱ्या घडामोडींनंतर संजय राऊत यांनी एक घोषणा केली. बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन चर्चा केल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल असे ते म्हणाले. या साऱ्या गोंधळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केले होते. त्याला भाजपाकडून टोला लगावण्यात आला.
शिवसेना सोडून जाणाऱ्या प्रत्येकाचा पुढच्या निवडणुकांमध्ये पराभव झाला, हा शिवसेनेचा इतिहास आहे. यावरून हे स्पष्ट होते की त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते हे आमदारांच्या बरोबर नसतात तर ते पक्षाबरोबर असतात. शिवसैनिकांनी अनेक वेळेला नेतेमंडळींना ही गोष्ट दाखवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे आमदार किती आहेत याची चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे जयंत पाटील म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना भाजपाचे अतुल भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला. "सत्तेच्या अगतिकतेपायी जयंत पाटील आपल्याच पक्षाच्या छगन भुजबळ यांची अब्रु वेशीवर टांगत आहेत. छगन भुजबळांना समोर देखील ही बेअब्रू निमूटपणे सोसण्या शिवाय अन्य काही मार्ग नाही", असा टोला त्यांनी लगावला. छगन भुजबळ यांनीही काही वर्षांपूर्वी शिवसेना सोडली होती. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीला टोला लगावण्याची संधी सोडली नाही.
दरम्यान, जयंत पाटील असेही म्हणाले होते की, सरकार गेल्यानंतर सर्वांना विरोधी पक्षात बसावंच लागतं. त्यात काही गैर नाही. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. आमच्याबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. आज शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना आवाहन केलं गेलंय. मुंबईत येऊन बोलावं. त्यानंतर ते निर्णय घेतील असं शिवसेनेने सांगितले आहे. वर्षा सोडून मातोश्रीवर जाणं हा मुख्यमंत्र्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. परिस्थिती पाहून त्यांनी निर्णय घेतला. ते आजही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतीही नाराजी नाही.