Jayant Patil Speech ( Marathi News ) : नाशिक जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मविआ उमेदवार राजाभाऊ वाझे आणि भास्कर भगरे यांचे अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना जयंत पाटलांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे.
कांदा प्रश्नावर केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, "काल परवा महाराष्ट्रातील कांदा पडून असताना फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्याचे पाप सरकारने केलं. त्यांना महाराष्ट्राचा कांदा दिसला नाही. विरोधात वातावरण जातंय पाहून देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयापाठोपाठ सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. यातून मोदी साहेबांचे आभार मानले आणि सांगितले की, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यातबंदीही उठवली. मात्र हे सत्य नाही. मागचाच निर्णय पुन्हा घोषित केला आहे," असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्योग थांबवायचा असेल तर निवडणुकीत मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हा समोरचे बटन दाबून आपली माणसं दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी घ्या, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे.
"संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण"
महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जिथं मतदान झालं आहे तिथं भाजपचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. "नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच महाविकास आघाडीच्या मागे खंबीर उभा आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, तिथे मी जाऊन आलो. या सर्व भागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण आहे," असं पाटील म्हणाले.
दरम्यान, "लोकांची गर्दी पाहून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार भास्करराव भगरे यांचा विजय निश्चित असल्याची जाणीव झाली," असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.