Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. मी पुन्हा येणार म्हटले की येतोच, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार करत खोचक टोला लगावला आहे.
इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो, या शब्दांत सीमाभागातील निपाणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. यावर आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
तुमचा फौजदाराचा हवालदार केला, आमची मापे काढू नका
जे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, असे म्हणत असतील. त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केला आहे. आता त्यांनी आमची मापे काढावीत का, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. तसेच आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्याचा नाही. शरद पवार यांच्या झंझावातात २०२४ ला हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष होणार आहे. हे तुम्हाला सक्षमपणाने सांगतो, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला एका वाक्यात उत्तर दिले. आता मी चाललोय निपाणीला, त्यामुळे कोण पार्सल आहे, आणि कोण किती वस्ताद आहे, या सगळ्या खोलात तिथे बोलायचे, इथे नाही, असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना निपाणीत जाऊनच उत्तर देऊ, असे स्पष्ट केले.