मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अंतर्गत वाद मधून-मधून समोर येत असतात. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावे की त्यांना भाजपासोबत जायचेय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देत, लगेचच टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. गोंदियामध्ये भाजपला राष्ट्रवादीने मदत केल्याने काँग्रेस एकटी पडली. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित जाऊ शकले नाहीत. गोंदियामध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युती केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. या एकूण घटनाक्रमानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही
जयंत पाटील यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना, गोंदियामधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पाठीत खंजीर खुपसला वगैरे अशी टीका करत आहेत. पण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. पण लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, इथून पुढेही तिन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. परंतु गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्रित जाऊ शकले नाहीत? तिथे अशी परिस्थिती का उद्भवली? याची आम्ही माहिती घेत आहोत. प्रफुल्ल पटेल परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, यासंबंधी नाना पटोले माझ्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. आम्ही तसा प्रयत्नही केला. पण स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, त्यांच्या मतालाही आपण किंमत दिली पाहिजे, त्यांची मतेही विचारात घेतली पाहिजे. आम्ही बरेच प्रयत्न केले, पण शक्य झाली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.