मुंबई : एल्गार परिषदेच्या वेळेस जे गैरहजर होते त्यांच्याविरोधातही एल्गार परिषदेच्या संदर्भातील गुन्हे दाखल केले गेले. समाजातील ख्यातनाम लेखक, कलावंत तसेच ज्यांची प्रतिभा यापूर्वी समाजामध्ये सिद्ध झाली आहे, अशा लोकांची नावंही आरोपींमध्ये असणे, हे अत्यंत धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.
जयंत पाटील म्हणाले की, पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत शंभर पेक्षा अधिक संघटना सामील झाल्या होत्या. मात्र कार्यक्रमाला हजर नसलेले अनेक विचारवंत, लेखक, कलाकार यांचेही नाव या प्रकरणात घेण्यात आले. अनेकांना नाहक तुरुंगात डांबले. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चौकशी एसआयटीमार्फत व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
तसेच तपास करणाऱ्यांची दृष्टी आणि डोकी शंका निर्माण करणारी आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तपास करणाऱ्यांच्या चौकशीची भूमिका घेतलेली आहे. तर यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा केली जाईल आणि कुठल्याही अडचणी येऊ न देता निर्णय घेण्यात येईल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
तर एल्गार परिषद प्रकरणात अनेकांना विनाकारण गोवण्यात आलं आहे. तिथं उपस्थित नसलेल्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले. मागच्या सरकारनं त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला. यात त्यांना काही पोलिसांनीदेखील साथ दिली. त्यामुळे या प्रकरणात आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायलाच हवी. तसा अधिकार राज्य सरकारला आहे. एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.