“राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:06 PM2022-06-13T16:06:01+5:302022-06-13T16:31:20+5:30
नवनिर्वाचित नगरसेवकांसह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सांगली: राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित मतेही मिळाली. एवढेच नव्हे तर एका अपक्षाचे अधिकचे मत मिळाले. यानंतर आता एका पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे उभे आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने आणि तत्त्वाने चालतो, धोरणात बदल होत नाही, असे म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूरमधील एकेकाळी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते राहिलेले आणि वसंतदादा पाटील यांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटील बोलत होते. खानापूर नगरपंचायतीच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही दुसऱ्याच कोणत्या पक्षात आला आहात, असे मानू नका. राष्ट्रवादी हा पक्ष कॉंग्रेसच्या विचारावरच, तत्त्वावर चालतो, असा सल्ला पक्ष प्रवेश केलेल्यांना जयंत पाटील यांनी दिला.
पण आम्ही जिद्द सोडली नव्हती
विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीमध्ये कुणीही पक्षप्रवेश करत नव्हते. याऊलट पेपर वाचला की, राष्ट्रवादीमधून काहीजण बाहेर गेले. काही जण जाणार आहे आणि काही जणांची शक्यता आहे, अशा बातम्या वाचायला मिळायच्या, पण आम्ही जिद्द सोडली नव्हती. शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी झंझावती दौरे महाराष्ट्रभर सुरू केले. त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण बदलून गेले. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या. जवळपास शंभर जागांच्या जवळ दोन्ही पक्षाला यश मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकारणात काहीही होऊ शकते, त्याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, संपतराव माने हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते म्हणून त्याकाळी ओळखले जायचे. खानापूर तालुक्याचे दोनवेळा ते आमदार झाले होते. सांगलीत काँग्रेस वाढविण्यात संपतराव माने यांचे कार्य मोलाचे राहिले. वसंतदादांचे नातू आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी संपतराव माने यांच्या वारसदारांचे सख्य होते. मात्र काँग्रेस अंतर्गत गटबाजी आणि काँग्रेस पक्षामधून डावलले जात असल्याचा नाराजीतून आता संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केल्याने खानापूर भागातील काँग्रेसबरोबरच वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचा गट ही फुटला.