मुंबई - भीमा कोरेगाव दंगल प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिंडेंना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील धडपड करत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एकंदरीत संभाजी भिडे यांच्यावरून पाटील-आंबेडकर आमने-सामने आले आहेत.
पोलीस अधिक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील होते. आता जयंत पाटील त्यांचा बचाव करतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच भाजपचं काम महाविकास आघाडीतील काही मंत्री करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
आंबेडकर यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संभाजी भिडेंचा बचाव प्रकाश आंबेडकरच करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहे. संभाजी भिडेंवरून आंबेडकर आणि पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारला न विचारताच तपास एनआयएकडे सोपविला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय चुकीचा आहे. या प्रकरणाच्या तपासातील खोटेपणा उघड होईल, अशी केंद्र सरकारला भीती वाटत असल्याचे ते म्हणाले.