Jayant Patil on Maha Morcha: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे लोक महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधाने करतात. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे. त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. मविआच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे शंभर टक्के एक अजेंडा आहे. एखादा बुरुज जर पाडायचा असेल तर त्या बुरुजाचा एका-एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाही, अज्ञानाने झालेले नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत. जुना इतिहास पुसून काढायचा, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान आहे. नवा इतिहास आपल्यापासून सुरू झाला पाहिजे, असे काही लोकांना वाटते त्यासाठीच खरा इतिहास पुसून नवा इतिहास मांडण्याचे कारस्थान सुरू केले आहे," असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
"महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल. कमी कशी होईल यासाठी प्रयत्न होत आहे. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोकं भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील. राज्यपालांना भाजपने तात्काळ हटवायला पाहिजे होते. राज्यपाल महाराष्ट्राच्या विरोधात वागतात, त्यांच्या एकाही कृतीवर केंद्रसरकारने भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रकल्प गुजरातला गेले. महाराष्ट्रातील तरुणांची संधी हिसकावून घेतली गेली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाही. उलट तिकडे आलेल्या नवीन सरकाराच्या शपथविधीला उपस्थित राहतात. हे दुर्दैवी आहे," अशा शब्दांत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले.
"महाविकास आघाडी सरकार असताना म्हैसाळ योजनेमार्फत जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्याची संपूर्ण व्यवस्था आम्ही केली होती. या भागांना ६ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्याची डिझाइनिंग पूर्णतः तयार आहे. हा विषय फक्त मंत्रिमंडळासमोर येऊन त्याला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज आहे. मात्र हे सरकार फक्त आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. आज सीमा भागातील अनेक गावे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतर राज्यात जाण्याची मागणी करत आहे. हे दुदैवी आहे," असेही पाटील म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"