Jayant Patil vs Eknath Shinde: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे. महाराष्ट्रातील जनमत या सरकारला पाठिंबा देत नाही. अनेक ठिकाणी या नेत्यांच्या सभा होतात. त्यावेळी खुर्च्या रिकाम्या असतात आणि नेते मात्र बोलत असतात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीची सभा महाराष्ट्रात व्हायरल झाली. मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत यातून आज काय परिस्थिती आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्रापुढे आले आहे, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.
आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता, शिंदे गटाच्या आमदारांनी अशा थराला पोचायला नको हे दुर्दैवी आहे. शिंदे गटाच्या आमदारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी ही कृती केली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
जेव्हा मुद्दे संपतात तेव्हा विरोधक गुद्दयावर येतात. आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत पसरवणे, त्यांच्यावर दगडफेक करणे असा प्रकार केला आहे, ही नाकर्तेपणाची भूमिका आहे असेही जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केला. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारांवर दबाव आणून पाहिजे त्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या हा कावा सत्तारुढ पक्षाचा दिसतो त्यामुळे पत्रकाराला चिरडून मारण्यात आल्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीत एका पत्रकारावर गाडी घालून चिरडून मारल्याची घटना पत्रकारांनी विचारली असता जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध केला.