सोलापूर : सत्तेचा दुरुपयोग विरोधक कसा करतात, हे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेवरून दिसून येत आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथील परिसंवाद कार्यक्रमात बोलताना केला आहे. आतापर्यंत विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. अनेक सरकारे आली आणि गेली कोणीही सत्तेवर आले, तरी असे कायम टिकत नाही. सध्या सुडाचे राजकारण चालू आहे. विरोधात बोलणार्यांना तपास यंत्राणांमार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे. याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेमुळे जयंत पाटील हे उद्विग्न झाल्याचे दिसत होते. जनता याबाबत योग्य ते निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या काही महिन्यापासून केंद्र सरकारी तपास यंत्रणाच्या माध्यमातून कशा दुरुपयोग करते, विरोधकांना कशी अडकवते याविषयी पुराव्यानिशीनवाब मलिक यांनी अख्ख्या देशाला उघड करून दाखवले होते, याचा सूड विरोधकांनी अशा प्रकारातून व्यक्त केल्याचे दिसते, असे जयंत पाटील म्हणाले.
तसेच, यावेळी व्यासपीठावरील माजी आमदार जयवंतराव जगताप यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांना पेचात टाकणारे प्रश्न उपस्थित केले. संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सहभागी होऊन जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची खुली ऑफर कार्यक्रमादरम्यान दिली. याचबरोबर, संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील गमजा घेऊन व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने संजय मामा शिंदे यांच्या गळ्यात घालून सन्मान करण्याचा विनंती केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी संजय मामा हे राष्ट्रवादीचेच आहेत त्यांना राष्ट्रवादीचा गमजा घालण्याची काही आवश्यकता नाही असे व्यासपीठावरून सांगितले. तसेच, आज माझा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेवटचा कार्यक्रम आटपून इंदापूरकडे रवाना होणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.