नागपूर – आमच्याकडे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ४५ आमदार आहेत. ते एकत्र आहेत. मंगळवारीही आमची बैठक झाली होती. आमचे आमदार एकसंघ आहेत. आणखीही आमदार येतील. जे बोलणारे आहेत तेदेखील येतील असा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.
धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून आमच्या सर्व आमदार, कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम आमचे मंत्री करत आहेत. आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी अनेक आमदारांना विचारलेही जात नव्हते. अजितदादा डॅशिंग नेते आणि प्रशासनावर पकडही आहे. त्यामुळे अजित पवारांवर विश्वास ठेऊन अनेक आमदार त्यांच्यासोबत आले आहेत असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मविआ असताना दादांनी आमदारांना, खासदारांना भरपूर निधी दिला होता. त्यानंतर दुसरं सरकार आल्यानंतर त्यावर स्थगिती मिळाली होती. परंतु अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि स्थगिती उठली. सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील कामे जोरात सुरू आहेत. जे आमदार नाराजीत होते, विरोधी बाकांवर समाधानी नव्हते. ते आता सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघात काम करतायेत. सगळ्यांना विश्वासात घेऊन महायुतीतील आमदारांना एकत्र ठेवले जात आहे. लोकसभेत ४५ तर विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे त्यादृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहेत असंही मंत्री धर्मरावबाबा आत्रामयांनी म्हटलं.
दरम्यान, लोकसभेची चर्चा अजून पक्षात व्हायची आहे. माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने मी कामाला लागलो आहे. ज्यांना ज्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आदेश देतील त्यांना लोकसभेत उभं राहावे लागेल. पक्ष मजबुतीसाठी, मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी उभे राहावे लागेल. आमच्याकडे ५३ आमदार होती, कुठलाही गट राहणार नाही असा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्रामयांनी केला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
१५ आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची पुन्हा येण्याची इच्छा आहे पण अंतिम निर्णय शरद पवार घेतील, आताच बोलून त्या आमदारांना अडचणीत आणणार नाही असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता.