पुणे : शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर ईडीने छापे टाकल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यात महाविकास आघाडीतील नेते व विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान शाब्दिक युद्ध छेडले गेले आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया देताना भाजपवर घणाघाती टीका देखील केली आहे.
पिंपरी चिंचवड येथे पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, पार्थ पवार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर छापे टाकले असले तरी यातून काही हाती लागेल असे मला वाटत नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर यातून आमच्या तीन पक्षांची एकजूट अजून बळकट होणार आहे. पण विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची ही जुनी परंपराच आहे.
पुढे पाटील म्हणाले, भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते याघडीला अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते पदवीधर निवडणुकीत मनापासून काम करताना पाहायला मिळत नाहीत. त्याचबरोबर शिवसेनेसारखा पक्ष या निवडणुकीत आपल्यासोबत आहे. त्याचा फटका निश्चितच भाजपला बसणार आहे. एकंदरीत या परिस्थितीचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे, तसेच त्यांच्या उमेदवाराकडे प्रचारात मांडण्यासारखे कोणतेही मुद्दे नाही
पदवीधर निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपाला बसणार असल्याचे मत देखील पाटील यांनी यावेळी नोंदवले.