"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:22 AM2024-11-10T11:22:11+5:302024-11-10T11:22:53+5:30
Jayant Patil Ajit Pawar: महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या घोषणांबद्दल अजित पवारांनी प्रश्न उपस्थित करत हल्ला चढवला. त्याला जयंत पाटील यांनी खोचक प्रत्युत्तर दिले.
Ajit Pawar Jayant Patil News: प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपये विमा कवच देण्याच्या महाविकास आघाडीच्या घोषणेबद्दल अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केला. यांच्या बा (बापाने) सांगितलं होतं का? असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या टीकेला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. 'इथे बापाचा विषयच नाही', असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांवर वार केला.
अजित पवार काय म्हणाले?
"मुंबईला महाविकास आघाडी बसली. आणि त्यांनी पंचसुत्री कार्यक्रम जाहीर केला. आम्ही (महायुती) पाच लाख रुपयांचं संरक्षण तुम्हाला देतो. पूर्वी दीड लाख होतं, आता पाच लाख केलं. आणि त्यांनी (महाविकास आघाडी) सांगितलं आता आमचं सरकार पुढं आल्यानंतर आम्ही २५ लाख रुपये एका कुटुंबाला विमा संरक्षण देऊ. ह्यांच्या बा (बाप)ने सांगितलं होतं का? २५ लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला विम्याचे संरक्षण", अशी टीका अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या घोषणेवर केली.
जयंत पाटील म्हणाले, 'बापाची गरजच नाही'
अजित पवारांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
जयंत पाटील म्हणाले, "राज्याचे उपमुख्यमंत्री सांगलीत गेले होते. त्यांनी सांगितलं एवढ्या-एवढ्या घोषणा केल्या. यांच्या बापालाही हे पूर्ण करता येणार नाही. अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार आहे. बापाचा विषयच नाही इथे, काकाच पूर्ण करणार आहेत तुमचे हा सगळा विषय. तुम्ही चिंताच करू नका. कारण या पाच मागण्या ज्या आहेत, या पाच मागण्या विचार करून आम्ही आणलेल्या आहेत", अशा शब्दात जयंत पाटलांनी अजित पवारांवर पलटवार केला.
जयंत पाटील विरुद्ध अजित पवार
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात राजकीय जुगलबंदी बघायला मिळत आहेत. सांगली दौऱ्यात होणाऱ्या प्रत्येक सभेत अजित पवार जयंत पाटलांना लक्ष्य करत आहेत. तर त्याला जयंत पाटलांकडूनही उत्तर दिले जात आहे. त्यामुळे सांगलीत जयंत पाटील विरुद्ध अजित पवार असाच राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे.