दीपक भातुसेमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर नाराज आहेत. तसेच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे आता अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याने सर्वाधिक अस्वस्थही आहेत.
प्रदेशाध्यक्ष असूनही राजीनामा देण्याच्या निर्णयाची साधी कल्पना पवारांनी जयंत पाटील यांना दिली नसल्याचे समोर आले आहे. मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर जयंत पाटील यांच्यासाठी तो मोठा धक्का होता. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले ते या धक्क्यामुळेच. पवारांच्या राजीनाम्याची कल्पना पक्षात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच होती. व्यासपीठावर शरद पवार हे अजित पवार आणि सुप्रिया यांच्याशी वारंवार चर्चा करीत होते, त्याचवेळी आपण पक्षात एकटे पडल्याची लख्ख जाणीव जयंत पाटील यांना झाली.
शरद पवार बुधवारी मुंबईत असूनही जयंत पाटील एका कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे बुधवारी प्रमुख नेत्यांबरोबर शरद पवारांनी चर्चाही केली. मात्र, जयंत पाटील गैरहजर होते. मी राष्ट्रीय नेता नाही, त्यामुळे अशा बैठकांबाबत काही माहिती नव्हते. या बैठकीबाबत मला सांगण्याची आवश्यकता वाटली नसावी, सगळीकडे आपण असावचे, असा आग्रह आपण पण करू नये, अशा शब्दात याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवारांच्या वर्चस्वाची भीती?सध्या राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन गट आहेत. मात्र, शरद पवारांनी या दोन्हींमध्ये योग्य समतोल राखला आहे. पवारच बाजूला झाले तर अजित पवारांचे वर्चस्व वाढल्यानंतर आपली पक्षात किती किंमत राहील, याची भीती जयंत पाटील यांना वाटत असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.