मुंबई : गेली तीन वर्षे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील.
राष्ट्रवादीत अन्याय झाला. स्वाभिमानाला ठेच पोहोचली. पक्षातील नाराजीबद्दल शरद पवारांशी चर्चा झाली. तरी सुद्धा पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्ष सोडावा लागतोय, असे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच, विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपविणार आहे. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर जयदत्त क्षीरसागर नाराज होते. तसेच, पक्षात आपली घुसमट होत होती, असे सांगत त्यांनी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यावर टीकाही केली होती. याशिवाय, बीडमधील एका कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. असे असेल तरी त्यांनी भाजपामध्ये की शिवसेनेत प्रवेश करणार, याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. मात्र, त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेत क्षीरसागर बंधू आणि माजी मंत्री सुरेश धस यांनी बंडखोरी करून भाजपाकडे सत्ता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडीचे स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाला. क्षीरसागर बंधूंच्या मातोश्री केशरकाकू यांनी ग्रामपंचायतपासून राजकीय प्रवासास सुरुवात केली. त्या तीनदा काँग्रेसमुळे खासदार झाल्या. शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीमध्ये आणले. क्षीरसागर घराण्याने जिल्ह्यातील सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताब्यात घेत वर्चस्व निर्माण केले आहे.