लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘न भूतो.. न भविष्यती’ अशा दोन राजकीय घटनांच्या चर्चेने सोमवारी संपूर्ण सातारा जिल्हा ढवळून निघाला. माणदेशातील बिदाल गावी श्रमदानाची पाहणी करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गाडीतून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रवास केला, तर ‘राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाचा त्याग करून थेट भाजपमध्ये प्रवेश करावा,’ असा दबाव खासदार समर्थकांकडून वाढला. ‘राजे भाजपच्या वाटेवर,’ अशा पोस्टही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर फिरल्या.पवार यांनी सोमवारी माण तालुक्यातील बिदाल व किरकसाल येथे जाऊन गावकऱ्यांच्या श्रमदानातून उभ्या राहात असलेल्या बंधाऱ्यांच्या कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेही त्यांच्या समवेत होते. या दौऱ्यात दोघांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उभा राहिलेले आमदार बंधू शेखर गोरे मात्र या दौऱ्यात नव्हते. दुसरीकडे उदयनराजे भाजपाच्या वाटेवर.... अशी एकच वावडी उठली. सध्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे साताऱ्यात नाहीत. त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. या गटाचा निर्णय जवळपास निश्चित झाला असला तरी मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाणे कोणालाच परवडणारे नसल्याने हा निर्णय काही काळानंतर घेतला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.
पवारांच्या गाडीत जयकुमार गोरे
By admin | Published: May 09, 2017 2:15 AM