परभणी, दि.५ : वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरात इंडिया बँकेच्या शेजारीच असलेले एटीएम मशीन जेसीबी मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न आज पहाटे ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास झाला. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून, तपास सुरू केला आहे़
शहरातील वसमत रस्त्यावर एमआयडीसी परिसरात स्टेट बँक इंडियाची शाखा आहे़. या शाखेसमोरच एटीएम मशीन बसविले असून, गुरुवारी पहाटे चोरट्यांनी याच परिसरात खानापूर फाटा येथे घराच्या बाहेर लावलेली जेसीबी मशीन चोरून एटीएम केंद्रासमोर आणली़. या ठिकाणी सुरुवातील जेसीबीच्या सहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला़. त्यानंतर चोरट्याने सोबत आणलेली तार एटीएम केंद्रातील मशीनच्या लॉकर असलेल्या बॉक्सला बांधून ती जेसीबीच्या सहाय्याने ओढून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जेसीबीने हे लॉकर तोडत असताना लॉकरचे हँडल तुटले़. त्यामुळे चोरट्याचा प्रयत्न फसला़ एटीएम केंद्राच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे़.
एटीएम मशीन तुटले नसले तरी त्याचे हँड तुटले आहे़. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोरटा तोंडाला रुमाल बांधून जेसीबी चालवित असल्याचे दिसत आहे़. सकाळी हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही़बी़ श्रीमनवार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले़. श्वानाने दोन वेळेस एटीएम केंद्रापासून वसमतकडे जाणा-या मार्गावर केवळ २०० फुटावरपर्यंत माग काढला़.
एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्याने याच भागात खानापूर फाटा परिसरात राहणारे पंडितराव मोहिते यांच्या मालकीचे जेसीबी मशीन चोरून आणले होते़. सकाळी ८़३० वाजण्याच्या सुमारास पंडितराव मोहिते यांना आपले मशीन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले़. त्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती कळविली़. तेव्हा हे मशीन एटीएम केंद्रसमोर आढळून आले़.
बँकेतून मिळालेल्या माहितीनुसार ३ आॅक्टोबर रोजी या एटीएम केंद्रामध्ये ३० लाख रुपये टाकले होते़. सध्याच्या बॅलेन्स पोझीशननुसार मशीनमध्ये १३ लाख ४० हजार रुपये आहेत़. पैशांची चोरी झाली किंवा नाही ही बाब तपासा अंतीच स्पष्ट होणार आहे़.