‘जेडीएस’ची मते काँग्रेसला गेल्याने भाजपला फटका, महाराष्ट्रात परिणाम नाही - फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:43 AM2023-05-14T09:43:03+5:302023-05-14T09:43:28+5:30
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटक जिंकल्याने काही लोकांना देश जिंकले असं वाटत आहे...
नागपूर : कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. तसेही कर्नाटकमध्ये १९८५ नंतर कुठलेही सरकार रिपीट होत नाही. २०१८ मध्ये आम्हाला जितकी मते मिळाली त्यात काही पॉइंटने कमी झाली; पण जागा कमी झाल्या. ‘जेडीएस’ची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटक जिंकल्याने काही लोकांना देश जिंकले असं वाटत आहे; पण त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. वाॅर्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो तरी त्यांना शाह-मोदींचा पराभव दिसतो. ‘बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना’ अशी काही लोकांची स्थिती आहे.
विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये मतदारांनी दिलेला कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. परंतु एखाद्या राज्याच्या निकालावरून आपण महाराष्ट्रासह देशाचा अंदाज बांधू शकत नाही. भाजपला २०१९ पूर्वी झालेल्या विधानसभा व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाला नव्हता; परंतु त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशात सत्ता मिळविली. त्यामुळे कर्नाटकच्या निकालावरून महाराष्ट्रासह देशाचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राष्ट्रवादीचे पार्सल परत -
शरद पवारांना तर कर्नाटकमध्ये एक जागाही मिळाली नाही. मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल वापस पाठविले, अशी टीकाही फडणवीस यांनी पवार यांच्यावर केली.