मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.
भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना आहे. निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यामागे राजकारण होते. रोहिनी खडसे तिकीट मागत नव्हत्या, तरीही दिले. अपमानास्पद वागून दिली जाते, हा विश्वासघात आहे. आधी असे राजकारणात होत नव्हते. गोपीनाथ मुंडे असते तर ही आली वेळ नसती, अशी खंत व्यक्त करत एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.
याचबरोबर, गोपीनाथ मुंडे असताना आम्ही नेहमी हसत-खेळत राजकारण केले. त्यांच्या संघर्षामुळे भाजपाला सध्या चांगले दिवस आले. गोपीनाथ मुंडे कार्यकर्त्यांचे आधार होते. ते पाठीत खंजीर खुपसणारे नव्हते. पंकजा, रोहिणीच्या पराभवामागे षडयंत्र होते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, या आधी ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वाकडे सांगत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, एकनाथ खडसे दिल्लीत गेले असता भाजपाच्या वरिष्ठांनी भेट न दिल्याने ते थेट शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत तर जाणार नाहीत ना, अशी चर्चाही सुरू झाली होती. याशिवाय, पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी विधान भवनात दाखल झाले.
शरद पवार, पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने एकनाथ खडसेंच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. तसेच, पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीतही पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे गैरहजर राहिले होते. त्यामुळे आजच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.