मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) अभियांत्रिकी अभ्यासक्रासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मेन (जेईई) आॅनलाइन पद्धतीने शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत पार पडली. दोन्ही दिवशी मिळून या परीक्षेला १ लाख ८३ हजार विद्यार्थी बसले होते. जेईई मेन आॅनलाइन परीक्षेत गणिताचा पेपर लांबलचक होता, तर भौतिकशास्त्राचा पेपर थोडा ट्रिकी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. आॅनलाइन पद्धतीने जेईई मेन परीक्षा शनिवार आणि रविवारी देशात एकूण ११३ शहरात ३३० केंद्रावर घेण्यात आली, तर देशाबाहेरच्या ९ शहरांतूनही परीक्षा घेण्यात आली होती. आॅनलाइन परीक्षा ३ तासांची होती. चार सत्रांमध्ये दोन दिवसांत ही परीक्षा पार पडली. गेल्या आठवड्यात जेईई मेनची लेखी परीक्षा २ एप्रिलला घेण्यात आली होती. या परीक्षेला १० लाख विद्यार्थी बसले होते. आॅप्टिकल मार्क रेकग्नायझेशन (ओएमआर) शीट एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहेत, तर २७ एप्रिलला जेईई मेनचा निकाल जाहीर होणार असल्याचे सीबीएसईकडून जाहीर करण्यात आली. (प्रतिनिधी)
जेईई आॅनलाइन मेन परीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2017 4:34 AM