जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची २३ मार्चला होणारी खंडोबाची सोमवती अमावास्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. आज झालेल्या ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी (दि.२३) मार्च सोमवती अमावास्या आली आहे. मात्र सूर्योदयानंतर दुसऱ्या प्रहरात अमावास्येला प्रारंभ होत असल्याने पालखी सोहळा निघणार नाही. या शिवाय खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळनेही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करावी, अशी सूचना केली होती. यामुळे सोमवती यात्रा व पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवती यात्रा भरणार नाही. पालखी सोहळ्याबाबत विचारविनिमय करण्याबाबत पेशवेवाडा येथे बैठक पार पडली.यावेळी खंडोबादेवाचे मुख्य मानकरी राजाभाऊ पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, रमेश राऊत, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, अमोल शिंदे, दत्ता सकट, किसन कुदळे, अरुण खोमणे, राजाभाऊ खाडे, माणिक पवार, खंडेराव काकडे, माधव बारभाई, काळूराम थोरात उपस्थित होते. ..............शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीची यात्रा रद्दरांजणगाव गणपती : कोरोना विषाणू रोगाच्या पार्श्वभूमीवर व खबरदारी म्हणून निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री म्हसोबादेवाचा रविवार दि. १५ व सोमवार दि. १६ रोजी होणारा यात्रा उत्सव पुणे जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रद्द करण्यात आल्याचा निर्णय यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे ग्रामसभेत घेतल्याची माहिती सरपंच ज्योती शिर्के यांनी दिली. ग्रामसभेत ठरल्यानुसार श्री म्हसोबा देवाची पूजाअर्चा तसेच नैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम नियोजित दिवशी वेळेनुसार पार पडतील, मात्र सदर यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेले सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहे. ..........नावळी पिरसाहेबांची यात्रा रद्दजेजुरी : कोरोना विषाणूमुळे जगभरात घबराट निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात ही सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोनाचा परिणाम या यात्रा उत्सवांवर ही होऊ लागला आहे . पुरंदर तालुक्यातील मौजे नावळी येथील पिरसाहेबांची यात्रा खबरदारीचा उपाय म्हणून यंदा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यात्रा करायची की नाही या संदर्भात तुकाराम बीजच्या दिवशी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात ग्रामस्थांची बैठक झाली. चर्चेतून यंदा यात्रा न भरवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
जेजुरी येथे सोमवती अमावास्येला होणारी खंडोबाची यात्रा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:59 PM
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय
ठळक मुद्देसोमवारी (दि.२३) मार्च सोमवती आली आहे अमावास्या