नागपूर : रणजी करंडक स्पर्धेत ‘ब’ गटात झारखंडने विदर्भाविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर तीन गुणांची कमाई केली. वायनाड येथे रविवारी संपलेल्या या लढतीत विदर्भाला एका गुणावर समाधान मानावे लागले. विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना झारखंडने पहिला डाव ३६२ धावसंख्येवर घोषित केला होता. विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद ३१५ धावांची मजल मारली होती. त्यापुढे खेळताना विदर्भाने दुसऱ्या डावात ४४४ धावा फटकावल्या. झारखंडने दुसऱ्या डावात ४ बाद ७५ धावांची मजल मारली असता पंचांनी सामना संपल्याचे जाहीर केले. आदित्य शनवारे (५४) आणि रवी जांगिड (५६) चौथ्या दिवशी धावसंख्येत केवळ ६ धावांची भर घालून बाद झाले. विदर्भाची ५ बाद ३१२ अशी अवस्था असताना अक्षय कर्णेवार (३९) आणि जितेश शर्मा (३५) यांनी संघाला चारशेचा पल्ला गाठून दिला.दुसऱ्या डावात श्रीकांत वाघचे (३१ धावा, ६ चौकार) योगदानही उल्लेखनीय ठरले. (क्रीडा प्रतिनिधी)
विदर्भाविरुद्ध झारखंडला तीन गुण
By admin | Published: November 01, 2016 2:04 AM