मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल जिया खान मृत्यूप्रकरणी तिची आई राबिया यांनी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राला विरोध करीत ही आत्महत्या नसून हे खून प्रकरण असल्याचे म्हटले आहे. सूरज पांचोली याने तिला आत्महत्येस प्रवृत केल्याचा आरोपपत्रातील निष्कर्ष राबिया यांना मान्य नाही. या प्रकरणात सीबीआयने शेवटपर्यंत हे खून प्रकरण असल्याचे भासवले; परंतु ऐनवेळी आत्महत्येचे आरोपपत्र दाखल केले, हे धक्कादायक असल्याची टीकाही राबिया यांनी केली. राबिया म्हणाल्या की, सीबीआयच्या आरोपपत्राने मला आश्चर्यचकित केले आहे. आम्ही संपर्क केलेले डॉ. शर्मा यांचेदेखील म्हणणे आहे की, हा खून आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ जेसन यांच्या म्हणण्यानुसार जियावर बोथट हत्याराने वार करण्यात आले. माझ्या मुलीचा खून झाला, हे मला माहीत आहे. सूरज तिला नीट वागवत नव्हता, तेव्हापासून तिने त्याच्याशी संबंध तोडले होते. इतकेच काय घटनेच्या दिवशी तेलगू गाणे मिळाल्यामुळे ती आनंदात गाणे गात होती. तिने आत्महत्या केली, यावर माझा विश्वास नाही. जे काही चालले आहे, ते अमानवीय व पाशवी असून यामागे कसले राजकारण आहे हे मला माहीत नाही. पण हे सर्व बड्या राजकारणाचा भाग आहे हे मात्र निश्चित, असे नमूद करून त्या म्हणाल्या की, मी अद्याप आरोपपत्र वाचले नसले तरी अनेक शंका माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मी शोधणार आहे. सीबीआयने अधिक खोलात तपास करावा असे मला वाटते, पण ते होत नाही. (विशेष प्रतिनिधी)>>> नैराश्याबाबत सूरजने कल्पना दिली होतीमुंबई : अभिनेत्री जिया खानच्या मनात घोळणारे आत्महत्येचे विचार तसेच काम न मिळाल्यामुळे तिने मनगट कापून केलेला आत्महत्येचा प्रयत्न या बाबी सूरज पांचोलीने तिच्या आईच्या कानावर टाकल्या होत्या, असा उल्लेख सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. जियाचे तिच्या व्यवस्थापकाशी असलेले संबंध संपुष्टात आल्यानंतर तिने मानसोपचार घेतले होते. आरोपपत्रात म्हटले आहे, की १८ मे २०१३ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सूरज जियाच्या घरी आला व तिच्या आईची भेट घेऊन जिया काम न मिळाल्यामुळे तणावाखाली असून, तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. आपल्याला काम करायचे असल्यामुळे थोडी मोकळीक हवी आहे, असेही त्याने तिला सांगितले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल दत्ता यांनी २००८मध्ये जियावर उपचार केले होते. कारण तिचा सचिव जयदीप याच्याशी असलेले संबंध संपुष्टात आल्यामुळे ती तणावग्रस्त झाली होती. डिसेंबर २०१२मध्ये पुन्हा डॉ. दत्ता यांचे उपचार तिने घेतले. यावेळी मात्र तिने आपल्या तणावाचे कारण स्पष्ट केले नाही, असा उल्लेख करून आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात सूरजने खोटी आश्वासने देऊन आपल्या कारकिर्दीचे नुकसान केल्याचा उल्लेख आहे. गर्भपातानंतर जियाने डायरीत नोट लिहिली, असा उल्लेख करून आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, मी गर्भवती असल्यामुळे घाबरले, पण मी माझे सर्वस्व तुला दिले होते. पण तू मला जे दु:ख दिले त्यामुळे मी उद्ध्वस्त झाले. मी जेव्हा खूप दुखावले गेले तेव्हा मी गर्भपात केला. न्यायवैद्यक पुराव्याची छाननी केल्यानंतर असे स्पष्ट होते की, सूरजने घटनेची खरी कारणे न देता त्याने माहिती दडवली, असे आरोपपत्रात म्हटले आहे. >>> त्या दुर्दैवी रात्री सूरजने जियाला केलेले अुनत्तरित मेसेज!१०:५६ -बोलायची इच्छा असेल तर फोन कर.१०:५६ - जाऊ दे१०:५७ - मी आंधळेपणाने तुझ्यावर विश्वास ठेवला. तू माझ्या आयुष्याचा तुरुंगच केला. माझ्यावर सतत पाळत ठेवली. हा घाणेरडा प्रकार थांबविला नाहीस तर आपलं पटणार कसं? कृपया, मला एकटे सोड.१०:५७ - तूच काय ते ठरव.१०:५८ - मी खूप नाराज आहे.११:०३ - तुझ्या यशाची मला असूया वाटते, असे तुला वाटते.... नीलूशी बोल आणि काय घडले याचा तू स्वत: शोध घे. गुरुवारी तुला आश्चर्यचकित करायचे आहे. नीलूसोबत तू माझ्यावर पाळत कशी ठेऊ शकते?११:०८- लगेच फोन कर.११:२१ - आताच फोन कर.११:२१ - तुझ्याशी बोलण्याची इच्छा आहे.
जिया खानच्या आईचा सीबीआयविरोधी पवित्रा
By admin | Published: December 12, 2015 2:23 AM