बारामती : पतीच्या अपघाती निधनानंतर अत्यंत हलाखीची, प्रतिकूल परिस्थिती वाट्याला आली. या परिस्थितीवर संघर्ष करून, मात करण्याचा प्रयत्न केला़ मुलीचे लाड, हट्ट नाही पुरवू शकले. तिनेही तो कधी केला नाही. मात्र, मुलीने डॉक्टर होऊन केवळ माझ्या संघर्षाचे सार्थक केले नाही, तर जीवनात यशस्वी होण्याचा माझा हट्टदेखील तिनेच पुरविला़ १२ फेब्रुवारी २००१ ला पतीचे अपघाती निधन झाले. त्या वेळी पतीला अवघा ९०० रुपये पगार होता. त्या तुटपुंज्या पगारात हलाखीची स्थिती असूनही आम्ही समाधानी जीवनाचा आनंद घेत होतो. मात्र, हलाखीतील हा आनंददेखील नियतीला पाहवला नाही. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आमचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले. या घटनेमुळे मी कोलमडून गेले. त्या वेळी मुलगी चौथीला, तर लहान मुलगा पहिलीला होता. धाय मोकलून रडले. मात्र, रडून, खचून कोणाला सांगणार होते. कांबळेश्वर (ता. फलटण) येथील माहेरी हलाखीची अवस्था होती. सासरदेखील याला अपवाद नव्हते. नातेवाइकांचाही आधार नव्हता. पती निधनानंतर छत्रपती कारखान्याने रुग्णालयात परिचारिका पदावर रुजू केले. त्यामुळे मुलांना घडविण्याची उमेद निर्माण झाली़ नोकरीच्या माध्यमातून मिळेल ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. आमची संघर्षमयी वाटचाल सुरू असताना, मुलगी शीतलने ‘आई मला डॉक्टर व्हायचंय गं’ असं तिच स्वप्न एकदा माझ्याशी बोलताना व्यक्त केले. तिच्या शिक्षणाची जिद्द बालवयातच मला जाणवली. तिला मी सकारात्मक प्रतिसाद देत गेले. १० वी, ११ वीला बाहेर शिकण्यासाठी पाठविले. १२ वीनंतर सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यासाठी बँक आॅफ महाराष्ट्रमधून २ लाख ३० हजारांचे कर्ज घेतले. व्याजाबाबत माहिती न दिल्याने, हे कर्ज ३ लाख ७८ हजारांवर गेले. नोकरी, भिशीच्या माध्यमातून हे कर्ज पूर्णपणे फेडले आहे. ...झाले तर डॉक्टरच होईल, नाही तर मला शिकायचं नाही. या माझ्या जिद्दीला आईने प्रतिकू ल परिस्थितीत साथ दिली. सगळं काही आज आईमुळेच आहे. तिचं स्वप्न पूर्ण करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार माझ्या मनात आलाच नाही. तिच्यामुळेच आमचे अस्तित्व आहे़- डॉ़ शीतल टेंगल ४वैद्यकीय महाविद्यालयात शीतलने अंतिम शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे माझे कष्ट सार्थकी लागले. सध्या तिने वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे, तर मुलाने डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ४ सध्या ती इंदापूर तालुक्यातील भवानीनगरला स्वत: दवाखाना चालवत असून, बारामतीत दुपारी खासगी दवाखान्यात प्रॅक्टिस करीत आहेत़
जिद्दीने मुलीला केले
By admin | Published: March 07, 2015 11:06 PM