लातूर- जिद्द व त्याला मेहनतीची जोड असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे आपण नेहमीच ऐकत असतो. पण लातूरमधील एका विद्यार्थ्याने ही बाब खरी करून दाखविली आहे. मेहनतीच्या जोरावर मोहसिन शेख या लातूरमधील मुलाने सीएती परीक्षा पास केली. पण मोहसिनची ही गगनभरारी अजिबात सोपी नव्हती. 25 वर्षीय मोहसिन हा वयाच्या पाचव्या वर्षापासून वीटभट्टीवर काम करत होता. वीटभट्टीवर काम करून त्यानंतर अभ्यास करून मोहसीन चार्टड अकाऊटंट अर्थात सीए झाला आहे.
दररोज पहाटे पाच वाजता उठून सात वाजेपर्यंत मोहसीन काम करायचा. सात वाजता अर्धा किलोमीटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडे बाराला जेवण संपवून 1 ते रात्री 9 पर्यंत वीटभट्टीवर काम. दहा ते दोन अभ्यास, अशा कठीण परिस्थितीत मोहसिननं यश मिळवलं आहे. मोहसिनच्या या यशामुळे शिर्डीच्या साई बाबा मंदिराचं ऑडिट करणाऱ्या सीए फर्मनं मोहसिनला पार्टनर केलं आहे.
मोहसिनच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. आई आणि भाऊ- बहिणी वीट भट्टीवर काम करुन पोट भरतात. मोहसिनला समज येऊ लागली तेव्हापासून तोही आईच्या साथीने वीटभट्टीवरच कामाला लागला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मोहसिनला मावशीकडे पाठवलं. मावशीची परिस्थितीही फार चांगली अशी नव्हती. मावशीही वीटभट्टीवरच काम करते. मोहसिनचं बालपण मावशीकडेच गेलं.
“ज्यादिवशी पाऊस पडायचा तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. कारण त्यादिवशी वीटभट्टीवर काम नसायचं. पण त्यादिवशी वीटा वाहून नेण्याचं काम करावं लागत असे. आजही आई-मावशी तेच काम करतात.
आई, भाऊ, मावशी यांना माझ्याबद्दल सकारात्मकता वाटायची. मी काही तरी करुन दाखवेन असं त्यांना नेहमी वाटत असे. त्यामुळे त्यांनी मला हवी ती मदत केली. सीएच्या नोंदणीसाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा भावाने साखरपुड्याची अंगठी विकून पैसे दिले, असं मोहसिन सांगितलं. खर्च कमी असतो त्यामुळे सीएचं क्षेत्र निवडलं. या काळात मला अनेकांनी मदत केली, त्यामुळेच आजचं यश पाहू शकलो, असं तो म्हणाला. मोहसिनने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भावना व्यक्त केली आहे.