बुलडाणा: सिंदखेडराजा येथे उद्या, सोमवारी जिजाऊ जन्मोत्सव साजरा होत असून, या सोहळयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीत सोमवारी सुर्योदयापूर्वी सकाळी ६ वाजता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता जिजाऊ सृष्टीवर आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाष कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र अढाव, राजे शिवाजीराव जाधव, बाबासाहेब बुरकूल आदी उपस्थित राहणार आहेत. जिजाऊ वंदनेने सांस्कृतीक कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. शाहिरांचे पवाडे, प्रकाशन सोहळा, नामवंतांची व्याख्याने, सामुहिक विवाह सोहळा आदी कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३0 वाजतापासून शिवधर्म पिठावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी मान्यवर अतिथींसह मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, राजे संभाजी भोसले, मनोज आखरे, छाया महाले आदी मार्गदर्शन करणार आहेत.जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला, रविवारी सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर दिपोत्सव साजरा झाला. त्यानंतर मशाल यात्राही काढण्यात आली. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यासह २0 शाखांचे पदाधिकारी आणि ५0 हजाराहून अधिक जिजाऊभक्त जिजाऊ सृष्टीवर दाखल झाले आहेत.
जिजाऊ जन्मोत्सव आज
By admin | Published: January 12, 2015 1:40 AM