औरंगाबाद : ‘जिंदादिल’ शायर म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या बशरसाहब यांच्या निधनामुळे औरंगाबादची ‘शान’ हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. जीवनातील खरेपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शायरीतून केला. आधुनिक विचारांचे शायर असलेल्या बशर नवाज यांनी गजलेच्या परंपरेचा मात्र नेहमीच सन्मान ठेवला. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी सर्वत्र कळाले. त्यांच्या विविध समाजातील आणि शायरीच्या चाहत्यांनी तसेच आप्तेष्टांनी त्यांच्या घरी धाव घेतली. गुरुवारी पहाटे ते पुस्तक वाचत होते. त्यांना सकाळी आठ- साडेआठ वाजता चहा लागत असे, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ते खोलीतून न आल्याने घरातील मंडळी त्यांच्या खोलीमध्ये गेली. त्यावेळी त्यांच्या छातीवर पुस्तक दिसले. सुरुवातीला ते झोपेत असावेत असे वाटले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्याचे लक्षात आले. बशर नवाज यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुली आणि चार मुले असा परिवार आहे. १८ आॅगस्ट १९३५ साली जन्मलेल्या बशर नवाज यांनी अगदी कमी वयातच आपल्या शायरीची चुणूक दाखविली होती. देश-विदेशात त्यांनी अनेक मुशायऱ्यांमध्ये सहभाग घेतला. देशातील तसेच विदेशातील विशेष करून आखाती देशांत आणि पाकिस्तानात त्यांना मुशायऱ्यासाठी आवर्जून बोलविले जायचे. त्यांची राहणी अतिशय साधी होती. पायजमा, कुर्ता आणि जॅकेट असा त्यांचा वेश असे. त्यांच्यात कधीही अहंभाव दिसला नाही. ‘करोगे याद तो, हर मौज याद आयेगी...’ ‘दिखाई दिये यूँ के बेखुद किया...’ या ‘बाजार’ चित्रपटातील त्यांची गाणी खूपच भावली. तरीही हिंदी चित्रपटसृष्टीत ते कधीच रमले नाहीत. जीवनातील विसंगतीवर त्यांनी आपल्या शायरीतून अचूक बोट ठेवले. रमजाननंतर ते सौदी अरेबियाला भारतीय वकिलातीतर्फे आयोजित मुशायऱ्यासाठी जाणार होते. राज्य उर्दू अकादमीच्या पुरस्कारासह, मिर्झा गालिब पुरस्कारानेही ते सन्मानित झाले होते.
‘जिंदादिल’ शायर बशर नवाज यांचे निधन
By admin | Published: July 10, 2015 2:29 AM