माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजकीय भूंकप करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यतत्वाचा तथा आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अशोक चव्हाण हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा हा काँग्रेससोबत महाविकास आघाडीलाही धक्का मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षातील मोठ्या चेहऱ्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षांतून नेतेमंडळी बाहेर जात असल्याचा दाखला देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षातून नेते बाहेर जात आहेत यामुळे पक्ष कमजोर होत नसून तरूणांना चांगली संधी निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षातून बाहेर पडत असणाऱ्यांना टोला लगावला. ते म्हणाले की, आणीबाणीनंतर सन १९७७ मध्ये इंदिरा गांधी विरूद्ध सर्व अशी एक लढाई झाली होती. या लढाईत इंदिरा गांधी यांचा दारूण पराभव झाला. हळूहळू सगळ्यांनीच त्यांची साथ सोडायला सुरूवात केली. पण, संजय गांधी यांच्या नेतृत्वाखालील युवकांनी रिकाम्या जागा भरण्यासाठी एक नवीन फळी निर्माण केली. त्याचा परिपाक म्हणजे १९८० साली ३०० च्या वर जागा जिंकून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या.
तसेच नेते सोडून गेल्याने पक्ष रसातळाला गेला, असे कधीच होत नाही. पक्षाचा 'मणका' म्हणजे कार्यकर्ते असतात अन् त्यातल्या त्यात तरूण मुले आणि मुली असतात. शेवटी रस्त्यावर येऊन लढण्याचे काम हे तरूण कार्यकर्तेच करीत असतात. किंबहुना जवळपास सर्वच आंदोलनात या तरूण कार्यकर्त्यांचाच अधिक सहभाग असतो. त्यामुळे विरोधी आघाडीतील सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे की, सर्व तरूण कार्यकर्त्यांना एक उत्तम संधी लाभली आहे. हे राज्य, या राज्याचे बिघडलेले राजकारण, बिघडलेली सामाजिक अवस्था, सुसंस्कृत राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आणि लोकशाहीची होत असलेली गळचेपी यातून मार्ग काढण्याची ताकद आणि हिंमत त्यांच्यातच आहे. तरूणांनो, तयार राहा पुढचा महाराष्ट्र आणि पुढचा भारत तुमच्या हातातच असेल, असेही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले.