२९ जून २०२४ या दिवशी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक जिंकला. टीम इंडिया भारतात परतताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वविजेत्या संघावर तब्बल १२५ कोटी रुपयांचा वर्षाव केला. भारतात रोहितसेना परतताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मग क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत विश्वविजेत्यांची झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी हजारोच्या संख्येने गर्दी केली. बीसीसीआयसह विविध राज्य सरकारांनी टीम इंडियातील खेळाडूंना बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिली. टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप करत राज्य सरकावर टीका केली.
जितेंद्र आव्हाड यांनी विश्वविजेत्या खेळाडूंना अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याचा दावा केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांनी हे आरोप केले. भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या विजेत्या संघातील खेळाडूंना कोट्यवधी रूपयांची बक्षिसे जाहीर केली. काल आम्ही ज्या हाॅटेलमध्ये मिटींगसाठी बसलो होतो. त्या हाॅटेलमध्ये विश्वचषक विजेत्या संघातील काही खेळाडू मला भेटले. बोलता-बोलता म्हणाले की, आम्हाला जी बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, ती अद्याप आम्हाला मिळालेलीच नाहीत, ही बाब खटकणारी आहे, असे आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले.
तसेच माझी महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की, इथे-तिथे पैसे वाटतच आहात. तर ज्यांना कबूल केले आहेत. त्यांचे तरी पैसे वाटून टाका. जसे हे क्रिकेटपटू मला बोलले तसे ते अनेकजणांना बोलले असतील. त्यातून सरकारचीच प्रतिमा मलिन होतेय, याचीच मला काळजी आहे, अशी टीका त्यांनी केली.