जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; "तुम्ही पवार नसता तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:24 PM2023-12-01T15:24:55+5:302023-12-01T16:14:33+5:30
शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीत मिळवायचा आणि आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते. सत्ता आमच्यासाठी महत्त्वाची नाही असं आव्हाड म्हणाले.
ठाणे - तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाला दावणीला बांधायचे होते. शरद पवार अडसर ठरत होते म्हणून त्यांना बाजूला काढायचे होते. वंशाचा दिवा इथपर्यंत तुम्ही खाली घसरता. तुम्ही पवार नसता तर बारामतीतून निवडून आला असता का? तुमची पुण्याई म्हणून त्यांच्या घरात जन्मला. आव्हाडांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्ही ४ वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवले नसते. बंडखोरीनंतरही पक्षात घेतले नसते. काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. स्वत:च्या चुलत बहिणीचे हाल हाल केले असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनीअजित पवारांवर केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २००२ पासून बीड जिल्ह्यात खुनांची मालिका सुरू झाली त्यामागे आहे कोण? आम्हालाही बोलता येते. मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादी कुणी लागू नका. लोकशाहीत निवडणूक लढवायची असते. गाजावाजा कशाला? आमची नावे कशाला घ्यायची, आमचा संबंध काय? तुम्ही जाऊन मिटिंग करायचे, रात्रभर तुम्ही बसायचे. जितेंद्र आव्हाडला मारणं सोप्पं आहे, गरीब, छोट्या समाजतला आहे मार टपली, तुम्हाला कोण बोलणार?. तुमचे प्लॅनिंग कधीपासून होते हे स्वत:च्या मनाला विचारा. ५ वर्ष शरद पवारांचे डोके कुणी खाल्ले हे स्मरुन सांगा. उद्विग्न आलेला माणूस काय करतो तर असे पटकन निर्णय घेतो. भाजपात कुणाला जायचे होते हे मला माहिती आहे. उठले की भाजपात जाऊया असं बोलत होते. २०१४ पर्यंत कुणी काही बोलत नाही. कारण सत्ता होती. शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीत मिळवायचा आणि आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते. सत्ता आमच्यासाठी महत्त्वाची नाही. सत्ता लोकांची सेवा करण्याचा मार्ग आहे. पण काही विचार, तत्वे जपून ठेवले होते. तुम्हाला केवळ सत्ता पाहिजे, बाकी विचार, तत्व खड्ड्यात गेले असा आरोप आव्हाडांनी केला.
तसेच १९९१ साली अजित पवारांना लोकसभा दिली, त्यानंतर मंत्रिपदे दिली. आजपर्यंत तुम्हाला शरद पवारांनी सगळं दिली. संघटना तुमच्या ताब्यात, सत्ता तुमच्याकडे हे आजपर्यंत कुणी दिले? पवारांमधील दोष आज दिसायला लागले. भाजपात जाण्याबाबत माझ्यासोबत ना बोलणे झाले, बैठका झाले मला यातले काही माहिती नाही. मी आंदोलन करण्यासाठी कुणाची परवानगी मागत नाही. अगदी शरद पवारांचीही मागत नाही. आंदोलन बळजबरीनं होत नाही. करायला हिंमत लागते. शरद पवार बोळ्याने दूध पितात का? आम्हाला खूप माहिती आहे हे सांगून घाबरवता का? हे बालिश राजकारण बस करा. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप बनत नाही. शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत तर खुशाल काढा. अशी आव्हानात्मक भाषा बंद करा. शरद पवारांनी अनेक आव्हाने बघितली आहे असं सांगत आव्हाडांनी अजित पवारांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, मी जे काही करतो माझ्या हिंमतीवर आणि ताकदीवर करतो. काहीही खोटे सांगू नका. तुमच्या प्रत्येक आरोपाचे पुरावे मी देऊ शकतो. कोणत्या फ्लाईटने कुठे गेला, रात्रीच्या अंधारातच दिल्लीला कसं जायचे असते हे सांगेन. शरद पवारांभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरतंय त्यामुळे त्यांची भाषणे पवारांवर आहे. शरद पवारांच्या नावाला स्पर्श केल्याशिवाय राजकीय उन्नती नाही हे सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्ही त्यांच्यावर तुटून पडणार असाल तर जे योद्ध्याचे काम आहे ते आम्ही करणार. त्यात बळी गेला तरी चालेल असंही आव्हाडांनी स्पष्ट सांगितले.
अंगाशी आल्यावर बालिश राजकारण
काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळलं, त्यामुळे भगीरथ बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही. बीडमध्ये मुंडे नावाच्या तरुणाला मारहाण झाली ती कुणी केली? आजही गुन्हा दाखल झाला नाही. कोण चोरडिया मला माहिती नाही. अंगाशी आल्यावर हे बालिश राजकारण करतायेत. शत्रू मोठा असला तरी काही गुप्तता बाळगायच्या असतात. आपल्या फायद्यासाठी नंतर गोष्टी काढायच्या नसतात. १९९९ साली पक्ष स्थापन झाला, तो शरद पवारांनी स्थापन केले. कुणालाही माहिती आहे. घड्याळ अख्ख्या देशात कुणी नेले ते पवारांनी नेले. ओडिशा, गुजरात, केरळात, अरुणाचलमध्ये आमदार होते. शरदचंद्र सिन्हासारखा ज्येष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला. या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्व मिळाले ते कुणामुळे? सभेत तुम्हाला साहेबांचा फोटो वापरावा लागला कुणामुळे? कालपर्यंत शरद पवारांना दैवत मानले आणि आज अचानक गोळ्या झाडतायेत. स्वत:ला पुढे करून ज्यांनी मागच्यांचे प्राण वाचवले त्यांच्यावर आरोप करतायेत. शरद पवारांना संपवण्याची सुपारीच घेतली आहे असा आरोप आव्हाडांनी केला.