Jitendra Awhad daughter Natasha: ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड गेले असताना त्यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली. आव्हाड गर्दीतून वाट काढत पुढे जात होते, त्यावेळी ती महिला समोर येताच आव्हाडांनी त्या महिलेला हाताने बाजूला केले आणि ते पुढे जात राहिले. मात्र, आव्हाड यांनी दोन्ही हातांनी धरून मला पुरूषांची गर्दी असलेल्या ठिकाणी ढकलल्याचा आरोप त्या तक्रारदार महिलेने केला आहे. या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या बचावासाठी विविध प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान, जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिने आपल्या वडीलांवरील या तक्रारीबाबत अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली.
विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर त्याचा नक्कीच परिणाम झाल्याचे त्यांची कन्या नताशा हिने सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असून तुम्ही त्यांची मुलगी म्हणून या प्रकरणाकडे कसं बघता? असा सवाल नताशाला विचारण्यात आला. त्यावेळी तिने आपले मत मांडले. "कुटुंबातील एका सदस्यावर अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे कौटुंबिकदृष्ट्या आम्हाला खूपच मानसिक त्रास झाला आहे. असं घडल्यामुळे आम्ही सारेच काहीसे 'डिस्टर्ब्ड' आहोत. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा किती आणि कसा दुरूपयोग केला जातोय हे या प्रकरणात दिसत आहे," अशा शब्दांत नताशाने वडीलांना भक्कम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
तक्रारदार महिलेनं नेमकं काय म्हटलं?
"तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित होतो आणि प्रचंड गर्दी होती. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊनच आम्ही सहजपणे मुख्यमंत्र्यांना भेटता यावं यासाठी कारच्या जवळ एका रांगेतून पुढे जात होतो. त्यात तुम्ही आमच्या पुढे श्रीकांत शिंदे यांनाही पाहू शकता. माझे मुख्यमंत्र्यांच्या पीए सोबतही त्यांच्या भेटीसाठी बोलणं झालं होतं. त्यासाठी आम्ही कारच्या कडेने पुढे जात होतो. पण त्यावेळी समोरून स्थानिक आमदार आले. आता ते आमदार असल्यानं मी त्यांना पाहून स्माइल केलं. पण त्यांनी तू इथं काय करतेस असं म्हणत मला दोन्ही हातांनी पकडून ढकललं. जिथं पुरुषांची गर्दी होती त्या ठिकाणी मला ढकललं गेलं. धक्का लागणं आणि धक्का देणं यात फरक आहे," अशा शब्दांत भाजपा पदाधिकारी असलेल्या तक्रारदार महिलेने आपली बाजू मांडली.
अजित पवारांकडून आव्हाडांची पाठराखण आणि राज्य सरकारला इशारा
"लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे 'चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे' असतात ही पण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या," असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.