NCP Maharashtra Political Crisis: आज मुंबईत दोन ऐतिहासिक कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एकीकडे अजित पवार गटाचा मेळावा होत आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाचा मेळावा होत आहे. शरद पवार गटाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे वाचनदेखील केले. पॉलिटिकल पार्टी आणि लेजिसलेचर पार्टी एकच नसते. पॉलिटिकल पार्टी आणि लेजिसलेचर पार्टी एक मानली, तर 10व्या शेड्युलला अर्थच राहणार नाही, असं आव्हाड म्हणाले.
ते पुढे म्हणतात, संविधान तुडवलं जातंय. आमदार म्हणजे खरेदी-विक्री संघ आहे? कांद्या-बटाट्याचा भाव आहे? कोर्टाने निकालात स्पष्टपणे म्हटले आहे की, निवडून आलेला आमदार आणि पक्षाचा संबंध आईच्या नाळेसारखा आहे. पक्ष आई-बाप आहे, तर व्हिप नाळ आहे. ही नाळ तोडता येत नाही. तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर पडा, पण तुम्हाला मर्जरशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कुठल्यातरी पक्षात प्रवेश करावाच लागेल, त्याशिवाय तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. हा पक्ष आता भाजप आहे. एकही आमदार अपात्र झाल्याशिवाय राहणार नाही. सुप्रीम कोर्टाने यांच्या नाड्या घट्ट आवळून ठेवल्या आहेत.
तुम्हाला निवडणूक प्रचारासाठी शरद पवार लागतात, सगळ्या गोष्टींसाठी शरद पवार लागतात. आता अचानक उठून म्हणतात, आम्हाला शरद पवार नको. जर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असाल, तर कशाला साहेबांचा चेहरा वापरता. तुम्ही स्वतःचा चेहरा वापरा आणि निवडून या. उन्हात, पावसात, आजारपणात, 30 वर्षे घाम गाळून साहेबांनी पक्ष उभा केला आणि तुम्ही सभेतून साहेबांना प्रश्न विचारता. 2004 मध्ये तोंडातून रक्त येत होतं, तेव्हा हॉस्पिटल सोडून साहेबांनी पहिली सभा नागपूरमध्ये घेतली. त्या बापाला एवढ दुख देता आणि वरती म्हणता तुम्हीच आमचे गुरू आहात. तुम्ही साहेबांना जखमी केलं, आता हा जखमी शेर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जे आमदार साहेबांसोबत राहतील, ते वाचतील, इतर घरी जातील, असंही आव्हाड म्हणाले.