मुंबई: क्रूर औरंगजेब हिंदूद्वेष्ठा नव्हता, असे वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कारमध्ये बसलेली महिला दिसत आहे. या व्हिडिओसोबत आव्हाड यांनी लिहिले की, "354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ. त्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरू आहे,'' असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी आव्हाडांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने खांद्या दाबून बाजूला हो असे म्हणत ढकलले, अशी तक्रार महिलेने केली होती. विशेष म्हणजे, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलेलं 354 हे विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित कलम आहे, तर 376 हे बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधीत आहे. आव्हाडांच्या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.