मुंबई : हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
आव्हाड यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, हिंगणघाट प्रकरणातील ताईचा आज मृत्यू झाला.जीवनाच्या लढाईत जरी तू हरली असलीस तरी तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे.या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागून जेंव्हा तिला न्याय मिळेल तेंव्हाच तिला ती योग्य श्रद्धांजली ठरेल.
हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.