Jitendra Awhad News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला चितपट केले. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आले. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. यानंतर आता राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली आहे. बारामतीकरांनी थोरल्या पवारांना काैल दिल्याने येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम बारामतीवर होण्याचे संकेत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढण्यात विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त युगेंद्र पवार यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. बारामतीच्या निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
बारामतीबाबत प्रश्न विचारून माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करत आहात, तुम्ही सर्वांनी मला कायमचे घरी बसवण्याची योजना आखली आहे का? ते शरद पवारांचे घर आहे. त्या घरावर आपण उगाच टकटक का करावे? आपण त्यात पडू नये, असे आव्हाड म्हणाले. दुसरीकडे, युगेंद्र यांनी बारामतीत लक्ष घातले होते. शहरातील प्रत्येक गल्लीत, भागात त्यांनी पायी फिरत प्रचार केला. बारामतीकरांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले होते. बारामतीच्या विकासात शरद पवार यांच्या असणाऱ्या योगदानाबाबत त्यांनी जाहीर भाषणातून सांगितले. बारामती स्थानिक पक्ष कार्यालयाची सूत्रे त्यांनी पहिल्या दिवसापासून हाती घेतली. नवीन पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेत प्रचारात उतरविण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली.
दरम्यान, युगेंद्र पवार यांना बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. मी केवळ चर्चा ऐकतोय, माझ्यापर्यंत याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मला काही लोकांनी सांगितले की परवा कुठेतरी एक बैठक झाली, त्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे. परंतु, माझ्यापर्यंत कुठले अधिकृत पत्र वगैरे आले नाही, असे युगेंद्र पवार म्हणाले.