मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात गेल्या २४ तासांत एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी संचारबंदी आणि जमावबंदीसह अनेक निर्बंध लागू केले आहेत. अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रकारांच्या संदर्भात मागणी केली आहे. (jitendra awhad requested uddhav thackeray to give corona vaccine to journalist)
राज्यात कोरोनाची स्थिती वाढत असून, लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडमधील सर्व पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून घोषित केले असून, कोणत्याही वयोमर्यादेच्या बंधनाशिवाय पत्रकारांना कोरोना लस देण्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना कोरोना लस देण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. यासंदर्भात एक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी केली आहे. आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले.मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत, जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणेजरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर
राज्यात कडक निर्बंध
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवार आणि रविवारी संचारबंदी, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी, असे विविध निर्बंध लागू करीत राज्य सरकारने राज्यात अंशत: लॉकडाउनच लागू केला. मात्र, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसून, वृत्तपत्र वितरणासही मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईमधील रुग्णवाढीने रविवारी नवा उच्चांक गाठला असून, तब्बल ११ हजार १६३ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण वाढीचा दर १.६१ टक्के झाला असून, रुग्णदुपटीच्या कालावधीत मोठी घसरण झाली आहे.