ठाणे - शरद पवार यांनी आपली भूमिका बदलावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही देखील आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. जिल्हा पातळीवर देखील अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील सर्वच पदाधिकारी यांनी राजीनामे आज दिले आहेत. पवार यांनी लोक भावनेचा आदर करावा, आणि आपला निर्णय मागे घ्यावा, देशाला त्यांची गरज आहे, तुम्ही भीष्म पितामह आहात त्यामुळे आपला राजीनामा मागे घ्यावा, आमची लढाई ही तुम्ही असल्यामुळे लढत आहेत, त्यांच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही लढाई लढत राहत होतो. त्यामुळे निर्णय मागे घ्यावा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. २०२४ च्या लोकसबा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी उचललेल्या या पावलाचा परिणाम राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येणार आहे. शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांच्या समितीची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार यांनी सांगितले की, शरद पवार यांना आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांची वेळ हवी आहे, त्यामुळे आता पवार काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.