मुंबई: नागरिकत्व कायद्याचा विरोधात देशभरात आंदोलन सुरु असून राज्यात सुद्धा याचे राजकीय पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
देशात स्वातंत्र्यानंतर ही सर्वात मोठी लढाई आहे. मुस्लिमांचे नाव समोर करुन हिंदूंना गाफील ठेवण्याची ही नीती आहे. आसाम राज्यात १४ लाख हिंदू बांधवांकडे कागदपत्रे नाहीत. महाराष्ट्रातही ऊसतोड कामगार, पारधी समाज, असे अनेक समाज आहेत ज्यांच्याकडे पूर्वजांची कागदपत्रे सापडणार नाहीत. त्यामुळे नागरिकत्व कायद्याचा फटका त्यांना सुद्धा बसणार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
तर मोदींच्या रुपाने 'हिटलर'चा पुनर्जन्म झाला आहे. लवकरच सोशल मीडियासाठी कायदा आणणार आहेत. तेव्हा तुम्ही काढलेले फोटो किंवा तुम्ही कोणासोबत संभाषण केले, हे सुद्धा मोदी यांना कळणार आहे. त्यांना तसेही दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय असल्याचा खोचक टोला आव्हाड यांनी मोदींना लगावला.
औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात आव्हाड यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी आपल्या कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जहरी टीका केली. हा लढा हिंदू-मुस्लीम नव्हे तर हेगडेवार,गोळवलकर यांच्या विचारांच्या विरोधातील असल्याचे सुद्धा आव्हाड म्हणाले.