राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. यावरील गुन्ह्यात आव्हाडांच्या जामीन अर्जावर ठाण्याच्या न्यायालयात सुनावणी सुरु होती. याचा निकाल दुपारी दोन वाजता देण्यात येणार आहे. आव्हाड यांच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर सरकारी वकिलांनी देखील प्रतियुक्तीवाद केला आहे. यामध्ये त्यांनी आव्हाडांच्या जामीनाला विरोध केला आहे.
आव्हाड यांच्याकडून ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी युक्तीवाद केला. वकिलांनी कोर्टासमोर एक व्हिडीओ दाखविला. मुख्यमंत्री ठाण्यात आले होते गर्दी झाली होती. धक्काबुक्की होऊ शकत होती. अर्जदार आव्हाड हे तिथे गर्दीत काही चुकीचं होऊ नये असा प्रयत्न करत होते, असे वकिलांनी म्हटले. पोलिसांनी एफआयआर कॉपीत टाकलेले शब्द आणि जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून निघालेले शब्द यात फरक आहे, असा दावा देखील करण्यात आला.
तसेच आव्हाड यांनी कोर्टाला मी कोर्टाने दिलेल्या अटी शर्थीचे पालन करण्यास तयार आहे. माझ्याकडून जप्त करण्यासारखे काहीही नाहीय. तरीही पोलिसांना मला तुरुंगात का डांबायच आहे, असा सवाल केला. मी इथेच राहतो मला जेव्हा चौकशीला बोलावतील तेव्हा मी हजर राहायला तयार आहे. राज्यात सुरू असलेले राजकारण सध्या आपण टीव्हीवर पाहतोय. त्यातूनच या सगळ्या गोष्टी घडत आहेत. घटनेच्या वेळी मुख्यमंत्री होते. लोक होते. सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होते, असा दावा आव्हाडांकडून पोलिसांनी केलेल्या दाव्यावर करण्यात आला.
जर तक्रारदार महिला ओळखीची होती, तर आव्हाड यांनी त्या महिलेला हात लावायला नको होता. ते तोंडाने बाजूला हो असे सांगू शकत होते. या प्रकरणात अनेक साक्षीदार आहेत, यामुळे आम्हाला पुढे तपास करायचा आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी करत आव्हाड यांच्या जामिनाला विरोध केला.