शिर्डी - मी सकाळी ६ वाजता उठतो. सकाळी उठल्यावर करणार काय? अधिकाऱ्यांची झोप खराब करायची? ६ वाजता काम सुरू होत नाही. तुम्हाला झोप लागत नाही ही आमची चूक आहे का? कुठल्याही अधिकाऱ्याला अजित पवारांचे ६ वाजताचे बोलावणे आवडायचे नाही. आमचेही अधिकारी मित्र आहेत. तुमचे आऊटपूट काय? प्रत्येक विभागात हस्तक्षेप करणे. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मंत्र्यांना अस्वस्थ करणे हे तुम्ही केले नाही का? तुम्ही सुनील केदार यांना त्रास दिला नाही का? असे अनेक मंत्री होते जे खासगी बोलायचे. उपमुख्यमंत्रिपदच संविधानिक नाही. मग कुठल्या अधिकाराखाली तुम्ही बैठका घेत होता? असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनीअजित पवारांवर केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात माध्यमांशी बोलताना सर्वकाही पहिल्यांदाच बोलले. आव्हाड म्हणाले की, माझ्याकडे पालकमंत्री पद येऊच दिले नाही. एकनाथ शिंदे-अजित पवार हेच पालकमंत्री ठरवत होते. मला पालकमंत्री पद द्या असं मी अजित पवारांना भेटून सांगितले होते. मला एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले. जितेंद्र आम्हाला रायगड हवं होते. आम्ही पालघर तुम्हाला द्यायला तयार होतो. मी खास तुझ्यासाठी पालघर सोडले होते. परंतु अजित पवार रायगड सोडण्यास तयार नव्हते. कारण आदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्री बनवायचे होते. माझा प्रश्न अजित पवारांना तेव्हाच होता. मी पक्षात ज्येष्ठ नाही का? मला कोरोना झाल्यानंतर २ तासांत तुम्ही पालकमंत्री पदावरून काढलं, त्यानंतर कोरोना झालेल्या किती जणांना काढले? या पक्षात सावत्र होतो का? असा सवाल त्यांनी विचारला.
त्याचसोबत तुम्हाला स्वत:ला कोरोना झाला मग तुम्ही का राजीनामा दिला नाही? मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांना कोरोना झाला त्यांचा राजीनामा घेतला नाही. एकट्या जितेंद्रचा राजीनामा घेताना तुम्हाला बरं वाटलं ना...लगेच स्वत:चा दत्तात्रय भरणे तिथे नेमला. सोलापूरचे पालकमंत्रीपद शरद पवार साहेबांनी स्वत: बोलावून घ्यायला सांगितले. अजित पवारांनी बावनकुळेंना किती मदत केली हा इतिहास पाहा. अजित पवारांची कार्यशैली वेगळी आहे. मी खूप कडक आणि शिस्तप्रिय आहे याचा गाजावाजा करत असतात. अजित पवारांनी स्वत:चा एकतरी निर्णय सांगावा जो धोरणात्मक आणि महाराष्ट्राच्या हिताचा आहे. राजकीय इतिहासात तो लिहिला जाईल. असे शरद पवारांचे १०० निर्णय सांगितले जातील. इतिहासात नोंद केली जाईल असं एक काम तरी अजित पवारांनी सांगावे असा थेट सवाल आव्हाडांनी अजित पवारांना विचारला.
दरम्यान, सुनील तटकरे हे आपल्या पक्षाशी प्रामाणिक नाहीत ही शरद पवारांना जाणीव होती. रोज सकाळी जाऊन चला ना भाजपात जाऊ, असं विधाने करत होते. २०१९ ला अजित पवारांचा शपथविधी झाला. सकाळी ८ वाजता तटकरे शरद पवारांच्या बंगल्यावर जसं यांना काहीच माहिती नाही असं केले. इतका मोठा नटसम्राट मी माझ्या आयुष्यात बघितला नाही असा टोलाही आव्हाडांनी तटकरेंना लगावला.
तुम्हाला रामाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही
तुम्ही अजित पवारांना राम मंदिरात घेऊन जाणार आहात का? कुठल्या अधिकाराने? एकीकडे आईवडिलांसाठी रामानं १४ वर्ष वनवास भोगला तर दुसरीकडे या लोकांनी सत्तेसाठी शरद पवारांना बाहेर ढकललं. तुम्हाला रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार नाही अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
...तर संविधान अरबी समुद्रात बुडवतील
स्वप्न मीदेखील बघत असतो. स्वप्न बघणे चुकीचे नाही. १०० टक्के या देशातील लोकशाही नेस्तनाबूद होतेय. संविधान संपवलं जाईल. जर त्यांचे ४०० खासदार निवडून आले तर हे संविधान अरबी समुद्रात बुडवलं जाईल.तुम्ही ज्यापद्धतीने वागता त्यानं संविधान टिकणार नाही. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. देशात लोकशाही ठेवायचीच नाही. लोकशाही, संविधान पायदळी तुडवायचं आहे. ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे. या देशात आंदोलनाला प्रचंड महत्त्व आहे. ट्रकवाल्यांनी आंदोलनाची धमकी दिल्यानंतर ४८ तासांत कायदा मागे घेतला. लोकशाहीविरोधी कृत्य सुरु आहेत असा आरोप आव्हाडांनी केला.
एकनाथ शिंदेंकडून हे अपेक्षित नाही
एखाद्या मुख्यमंत्र्यांनी मतांसाठी एखाद्या धर्माला उकसवणं आणि तिथे वाद होईल अशी विधाने करणे हे चुकीचे आहे. तुम्ही एकनाथ शिंदे नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणे तुमचे काम आहे. तुमच्या मंत्रिमंडळातील भुजबळ ओबीसींना उकसवतात. तुम्ही मराठा समाजाला उकसवताय. तुम्हाला महाराष्ट्रात आग हवी का? महाराष्ट्र जिंकता येणार नाही यासाठी काहीही करून राज्यात जातीजातीत तेढ निर्माण करून भांडणे लावा हे हवंय का? एकनाथ शिंदेंकडून हे अपेक्षित नाही असं आव्हाडांनी सांगितले.