ठाणे - Jitendra Awhad on Praful Patel ( Marathi News ) जेव्हा माणसाला मन, हृदय आणि विचार असतात तेव्हा संकोच करतो. मला सत्तेत जायचंय म्हणून काय वाट्टेल ते करेन हे शरद पवारांना मान्य नव्हतं. शरद पवार हे व्यक्ती आहेत जे चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाही. याचा अर्थ तुम्ही इतके वर्ष शरद पवारांसोबत राहून तुम्हाला शरद पवार समजलेच नाहीत असं विधान करत जितेंद्र आव्हाडांनी प्रफुल पटेल यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, २ तारखेला मला भाजपासोबत जायचं नाही असं शरद पवारांनी जाहीर केले. त्यांच्याबाबत ५० टक्के ते भाजपासोबत जायला तयार होते असं म्हटलं जातं, हा ५० टक्के शब्द आणला कुठून? प्रफुल पटेल यांच्या डोक्यात काय आहे तेच शरद पवारांच्या मनात असलं पाहिजे असं काही नाही. २००४ साली भाजपासोबत जावूया ही प्रफुल पटेलांची इच्छा होती. पण तेच २००४ मध्ये मनात कुठलाही संकोच न बाळगता मंत्री झाले. माणूस संकोच तेव्हा करतो जेव्हा त्याला एखाद्या होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते. जेव्हा होणाऱ्या प्रकाराने दु:ख वाटते. तेव्हा तो संकुचित होतो. संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवतात. पण हे सत्तेसाठी वाटेल ते करतील असा टोला प्रफुल पटेलांना लगावला आहे.
तसेच तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवारांना संकोचित म्हणणं हे हास्यास्पद आहे. बातम्यात राहण्यासाठी तुम्हाला शरद पवारांचे नाव घ्यावे लागतात. शरद पवार कुठल्याही पक्षाचे नाव घेत नाही. पटेल शरद पवारांचे नाव घेतात आणि हेडलाईनमध्ये राहतात. पवार तुमच्याबाबत बोलत नाहीत मग कशाला तुम्ही शरद पवारांवर बोलता?. शरद पवार हे सत्तापिपासू नाहीत. १९६० पासून पक्ष संघटनेतून ते पुढे गेलेत. शरद पवार डोक्यावर टोपली घेऊन गावागावात भाजी विकायचे हे किती जणांना माहिती आहे? असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
दरम्यान, सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या रक्ताची आहे. जर त्यांना राजकीय फायदाच घ्यायचा असता तर त्यांनी सुप्रिया शरद पवार त्यापुढे सुळे लावलं असते. सुप्रिया सुळेंनी पवार नाव लावून घेतलं नाही. या निवडणुका कर्तृत्वावर लढायच्या असतात. तुमची लोकसभेतील कामगिरी किती, जागतिक माहिती किती, निवडणुकीत काही मुद्दे राहिले नाही त्यामुळे अशा मुद्द्यांवर येतात असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले आहे.