मुंबई – खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगात सुरू असून शुक्रवारी अजित पवार गटाने शरद पवार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले. पवारांनी पक्ष हुकुमशाहीने चालवला असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. या सुनावणीवेळी खुद्द शरद पवार आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. आज या सुनावणीवर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे दिसून आले. सुनावणीवेळी घडलेल्या प्रसंगामुळे आव्हाडांचे डोळे पाणावले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांच्या वकिलांचे बोलणे ऐकून कशाला लढतोय असं वाटलं. हे घरात बसल्यानंतर त्यांना फोन येणार तुम्हाला मंत्री बनवलंय, शपथविधी करा. या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचा काय फळ मिळाले तर ते हुकुमशाह आहेत? महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीने सांगावे, शरद पवार हुकुमशाहसारखे वागतात आणि त्यांनी पक्षात लोकशाही जिवंत ठेवली नाही. एवढेच होते तर तुम्ही सांगून जायचं होतं, तुम्ही लोकशाहीवादी नाही, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचे नाही. आम्ही स्वातंत्र्य पक्ष काढतो. त्यांच्या हातातील बाळ आता मोठं झालंय, वाढण्याचा प्रयत्न करतंय त्याचे वृक्ष झालंय, ते आता तुम्ही त्यांच्या हातातून उपटून घेण्याचा प्रयत्न करताय असा आरोप त्यांनी केला.
तसेच राजकारण समजू शकतो पण काल वकिलांमार्फत सुनावणीत जे बोलण्यात आले ते सहन होणारे नव्हते. ज्यांनी त्यांच्याकडून सगळे घेतले, इतके असंवेदनशील झालंय. हे पहिल्या सुनावणीत घडलंय. अजून खूप आहेत. तुमच्या मनाला त्याचे उत्तर द्यावे लागेल. शरद पवारांसमोर त्यांच्या वकिलांनी हे आरोप केलेत. काय घडेल काय नाही ही लढाई निवडणूक आयोगासमोर होतेय. अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस प्रतिज्ञापत्रे दाखल केलीत. पण प्रश्न संवेदनशीलतेचा आहे. ज्यांनी तुम्हाला वाढवले, प्रत्येक प्रसंगात तुमच्यामागे पहाडासारखा उभा राहिला. केवळ राजकीय लढाई जिंकण्यासाठी तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले ते कुणालाही सहन होणार नाही. शरद पवारांनी आयुष्यात कधीही लोकशाही मुल्याबाहेर काम केले नाही. राजकारण सोडून मदत करणारे आहेत. कुटुंबातील भांडणांनाही वेळ देणारे शरद पवार आहेत. कधी कुणाबद्दल वैयक्तिक द्वेष नाही. आज त्या माणसाला समोर बसवून आरोप करतायेत. सर्वसामान्य माणसाला ताकद मिळाली पाहिजे म्हणून आयुष्य खर्ची घातले. वयाच्या ८४ व्या वर्षी पवारांचे हृदय महाराष्ट्रासाठी धडधडतंय. त्यांच्याबद्दल कालचे उद्धार अनाकलनीय होते. कमीत कमी यापुढे तुमचा वकील हे बोलणार नाही याची काळजी घ्या असंही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.