मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शुक्रवारी केंद्र सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी शिवविचारांनी महाराष्ट्र पेटवणार, असा इशारा दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराला विरोध दर्शविला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'महाराष्ट्र पेटवणार… परत एकदा… शिवसन्मान परिषदा घेणार... ब.मो.पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले.' यासोबतच, त्यांनी या ट्विटमध्ये श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांची नावे हॅशटॅग केली आहेत.
याचबरोबर, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले, 'महाराष्ट्र भूषण दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं करताय? का पोसताय? जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती. सोलापुरात त्यांनी पुस्तकाचं कौतुक केले होते. दर दोन-चार वर्षांनी तुम्ही महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंना परत जर पडद्यावर अणत असाल, पुरस्काराने गौरविणार असाल तर हे पुरस्कार कशा माध्यमातून दिले जात आहेत, याबाबत सर्वसामान्यांचा मनात शंका निर्माण होत आहे. आम्ही महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार'.