मुंबई : गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. आज बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे तुकडे होणार असतील तर सर्वकाही राख होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
मंगळवारी चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी ते मीडियाशी बोलत होते. जर तुम्ही आमच्या बस फोडाल तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही का? आम्ही हातात बांगड्या घातल्या आहेत असं समजू नका. संपूर्ण कर्नाटकात जर मराठी माणसांचं प्रमाण पाहिलं तर २५ टक्के आहे, १०० टक्के तर इथेच आहेत. बंगळुरुपेक्षा अधिक लोक तर येथे मुंबईत आहेत. आम्ही त्यांना सांभाळून घेतो. आमचा मराठी माणूसच त्यांच्या इडली डोसा खायला जातो. त्यामुळे हे आपलेपण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तोडायचे आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
महाराष्ट्रातील गावं इतर राज्यांत जाण्याच्या मागण्या करायला लागलेत तर हे महाराष्ट्राला अस्थिर करण्याच काम सुरु आहे. हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. त्यामुळे जर माझ्यासारख्या व्यक्तीला कळले की महाराष्ट्राचे पाच तुकडे होणार आहेत तर सर्वकाही राख होईल. मला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोम्मई यांना सांगायला हवे होते की शांत बसा. एवढं आक्रमक होण्याची गरज नाही. हा वाद आजचा नाही १९४६ पासून सुरु आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दावा दाखल आहे, असे असताना बोम्मई कसे बोलू शकतात. खटला सुरु असताना तुम्ही असे विधान करणे चुकीचे आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
याचबरोबर, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस तिथं आहे हे दाखवून देणे सरकारचे काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामार्फतच राज्यांची पुनर्रचना झाली. भाषावर प्रांत रचना १९५६ मध्ये झाली. त्यानुसार महाराष्ट्रात पहिल्यांदा जे आंदोलन झाले ते मराठी साहित्य संमेलनात झाले होते. त्याचे अध्यक्ष होतो जत्रम माडगुळकर. त्यांनी ठराव केला होता की, बिदरी, भालकी, कारवार, बेळगाव आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. यासाठी अनेकांचे जीव गेले पण महाराष्ट्राला मिळाले काय तर केवळ मुंबई. तेव्हापासून बेळगावचे लोक लढत आहेत. त्यांना आम्ही एकटं सोडू शकत नाही. त्यांच्यासोबत सर्व मराठी माणसं उभी आहेत, हे सरकारने सांगणे गरजेचे आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला.
महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर दगडफेक!बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत. यात ६ ट्रकचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कन्नड रक्षण वेदिकाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले आहेत. कार्यकर्ते कन्नड रक्षण वेदिकेचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत आहेत. ट्रकच्या टपावर चढून आंदोलन करत आहेत. कर्नाटकच्या या आगळीकीवर महाराष्ट्रातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.