नियोजनची आढावा बैठक : पालकमंत्र्यांचे आरोग्य विभागाला निर्देशनागपूर : ग्रामीण भागातील लोकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊ त यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत दिले. वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार, प्रकाश गजभिये, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते.लोकांना जीवनदायी योजनेची माहिती व्हावी, यासाठी प्रचार करा. आरोग्य केंद्रात योजनेची पुस्तके उपलब्ध करून गावागावांत दवंडी द्या. कन्हान येथे डेंग्यूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. याबाबतचा अहवाल बुधवारपर्यत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा. पावसाळ्यात जिल्ह्यात डेंग्यू वा साथ रोग उद्भवणार नाही. यासाठी वेळीच उपाययोजना करा. जिल्ह्यातील साथ रोगाचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा, असे निर्देश राऊ त यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिले. डागा हॉस्पिटलला राज्यस्तरीय दर्जा दिला आहे. परंतु त्या तोडीच्या सुविधा उपलब्ध नाही. या रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यासाठी बारामतीच्या धर्तीवर अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले जाणार आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल सादर करा, तसेच वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे न पाठविता नियोजन समितीच्या स्तरावर मंजूर करण्याचे निर्देश राऊ त यांनी दिले.ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार पथदिवे, ट्रान्सफार्मर व वीज पोल उभारण्याची सूचना केदार यांनी केली. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुळक यांनी दिले. २००० सालापूर्वीच्या झोपडपट्टीधारकांना मालक ी हक्काचे प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने त्यांना वीज जोडणी मिळत नाही. तसेच काही भागातील घरांवरून वीज तारा गेल्या असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे प्रकाश गजभिये यांनी निदर्शनास आणले. याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुळक यांनी महावितरण व एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ‘जीवनदायी’ केंद्र
By admin | Published: August 06, 2014 1:12 AM