उरण : देशातील अग्रेसर, देशातील एकमेव युवा पोर्ट असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचा असलेला जेएनपीटी कंटेनर टर्मिनल२०१४-१५ या आर्थिक वर्षात १९३ कोटी तोट्यात आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी जागतिक प्रमुख १०० बंदरात २६ व्या स्थानावर असलेल्या जेएनपीटी बंदर आता ३० व्या स्थानापर्यंत घसरले आहे.जेएनपीटी बंदर १९८९ साली उभारण्यात आले. २६ वर्षात जेएनपीटीने नव्याने बांधलेली दोन शहरे बीओटी तत्त्वावर खाजगी कंपन्यांना दिली आहे. खाजगी दोन आणि जेएनपीटीचे स्वत:च्या मालकीचे अशी एकूण तीन बंदरे सध्या कार्यरत आहेत. जेएनपीटीच्या बंदरात प्रशासन, इस्टेट पोर्ट अॅण्ड डॉक, कंटेनर, बल्क आदी विभागत १,६७८ कामगार काम करीत आहेत. खाजगी दोन्ही बंदराकडे कमी कामगार आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही खाजगी बंदरे कमी कामगार आणि अत्याधुनिक सुविधांच्या जोरावर जेएनपीटी कंटेनर टर्मिनलपेक्षाही अधिक कंटेनर मालाची हाताळणी करीत आहे. त्यामुळे जेएनपीटी कंटेनर टर्मिनल २०१४-१५ या आर्थिक वर्षात १९३ कोटी ८७ लाख ३४ हजार ७९ रुपयांची तोट्यात आहे. जेएनपीटीला इतर खाजगी बंदरांकडून मिळणारे भाडे, रॉयल्टी, इस्टेट बल्क, इस्टेट, पोर्ट अॅण्ड डॉक यातून सर्व मिळणाऱ्या उत्पन्नामुळे जेएनपीटीला वार्षिक ५०० कोटी रुपयांचा नफा मिळत असला तरी जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीचा असलेला जेएनपीटी कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी) २०१४-१५ या आर्थिक वर्षात मात्र सुमारे १९४ कोटी तोट्यात असल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली.जेएनपीटी बंदरात पायाभाूत सुविधांचा असलेला स्वभाव, कामगारांना देण्यात येणारे विविध फायदे, जेएनपीटीने चालविलेली नाहक उधळपट्टी, कामगारांची आंदोलने, घटलेली उत्पादन क्षमता, संप, बंद, कामचुकार कामगार, सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी आदी विविध कारणांमुळे जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनल कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळेच जेएनपीटी कंटेनर टर्मिनल तोट्यात असल्याचा दावा जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे. (वार्ताहर)
जेएनपीटीला १९३ कोटींचा तोटा
By admin | Published: September 22, 2015 1:59 AM