उरण : सुमारे ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेले पीएसएचे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येत्या डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहे. हे बंदर देशातील सर्वांत मोठ्या लांबीचे आणि क्षमतेचे आहे. थेट परकीय गुंतवणूक आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारण्यात येणारे हे देशातील पहिले बंदर ठरणार आहे.जेएनपीटी बंदरांतर्गत खासगीकरणातून उभारण्यात येणारे पीएसएचे बीएमसीटी हे चौथे बंदर आहे. बंदरात अद्ययावत अशा सुपर पोस्ट पॅनामॅक्स क्वे क्रेन्स-६, रबर टायर्ड ग्रॅन्ट्री क्रेन्स-१८, रेल माऊंटेड ग्रॅन्ट्री क्रेन्स-४ बसवल्या आहेत. इथल्या कामाचे ३८ जणांना आॅगस्टमध्ये प्रशिक्षण मिळाले होते. त्यांना तज्ज्ञांकडून कार्गो हाताळणीच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. हा अनुभव फायदेशीर ठरणार असल्याचे प्रशिक्षार्थी भावना भोईर यांनी सांगितले. इतर घटकांबरोबरच क्वालिटी कंट्रोलवरही चांगल्या प्रकारे लक्ष देण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातून क्युसी क्रेन्स स्वत:हून चालविण्याचा भक्कम आणि सक्षम अनुभव मिळाला असल्याचे अभिजित कडू यांनी सांगितले. जेएनपीटी आणि संबंधित अधिकाºयांसोबत काम करून बंदर क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा बीएमसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश अमिरपू यांनी केला.
जेएनपीटीचे चौथे बंदर डिसेंबरमध्ये सुरू होणार, ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:58 AM