नाशिक : नाशिकच्या आर्टिलरी सेंटर येथे २०१६ मध्ये झालेल्या ब्लड रिलेशन भरतीत उत्तर प्रदेशातील कनोज व राजस्थानातील अश्वल धानी येथील दोघांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे़
नाशिकरोड येथे भारतीय लष्कराचे आर्टिलरी सेंटर असून या ठिकाणी सैन्यभरतीची प्रकिया तसेच सैन्यातील जवानांना प्रशिक्षण दिले जाते़ आर्टिलरी सेंटर येथील ऐटीआर ताराचंद बापूराव इंदापूर (४५) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी २०१६ मध्ये नाशिक आर्टिलरी सेंटर येथे ब्लड रिलेशन भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती़
यामध्ये संशयित राहुल भाटी सुखविर सिंग ( नंबर १५२४८०७८ वाय रिक्रूट डी़एम़टी, रा़ सतवारी, ता़ जिक़नोज, उत्तरप्रदेश) याने खोटे कागदपत्र सादर केले़ तसेच सूर्यप्रकाश राजेंद्र प्रसाद (आर्मी नंबर १५२४८६४८ के रिक्रूट, रा़ आश्वल धानी, पोस्ट - बुधना, ता़ झुनझुनू, राजस्थान) याने भाऊ रविप्रकाश राजेंद्र प्रसाद याचे कागदपत्रे वापरून त्याच्या नावावर नोकरी मिळवून लष्कराची फसवणूक केली़
दरम्यान, हा प्रकार लष्कराच्या लक्षात येताच त्यांनी अधिक तपास सुरू केला़ यामध्ये या दोघांनीही नोकरीसाठी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविण्याचे समोर आले़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़