ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 20 - देशसेवेचा ध्यास असल्याने सैन्यात दाखल होण्यासाठी एका तरुणाने देशातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्विसेसमधील (टीसीएस) लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आहे. भारत जाधव असे या तरुणाचं नाव असून तो बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा बुद्रुक गावातील रहिवासी आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, 25 वर्षांचा भारत जाधव हा टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होता. वडिलांचं निधन झाल्यानंतर घरातील परिस्थिती हलाखीची झाली. मात्र आईनं मोठ्या कष्टाने त्याला शिकवलं. लहानपणापासूनच हुशार असलेल्या भारतने शेगावमधील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2014 मध्ये पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मिळाली. पण देशभक्तीने पछाडलेल्या भारतचं आयटी सेक्टरमध्ये मन रमत नव्हते.
सैन्यात दाखल होण्यासाठी त्यानं 2010 एनडीएची परीक्षा दिली. मात्र यावेळी परीक्षेत अपयश आल्याने त्याची संधी हुकली. पण खचून न जाता त्याने आपले प्रयत्न सुरू ठेवले. 2016 मध्ये कम्बाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) ही संरक्षण दलाची परीक्षा दिली आणि त्यात त्याला यशही आले. 153 उमेदवारांमध्ये 108वा क्रमांक मिळवला असून तो एक एप्रिलपासून चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अकाडमीत प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.
दरम्यान, ऑफिसच्या एसीमधून बसून नेहमी एकसारखेच काम करायचे नव्हते. देशासाठी काही तरी करण्याची इच्छा होती, त्यामुळे आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अशी प्रतिक्रिया भारतने दिली आहे. 48 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारत आर्मीमध्ये शॉर्ट सर्विस कमिशनर पदावर रुजू होणार आहे. केवळ भारतच नाही तर त्याचे कुटुंबीयही संरक्षण दलात आहेत. भारतची लहान बहिण ही सीमा सशस्त्र दलात आहे. तर त्याचा लहान भाऊदेखील आर्मीत आहे. तर त्याची मोठी बहिण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात नर्स आहे.